ऑक्सीजनचा होणारा तुटवडा आणि लोकांची अडचण आपण पाहतो आहोतच. नाशीकची ही बातमी आपण आता वाचलीच असेलच..
गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू
मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार
ऑक्सीजनचा तुटवडा आणि त्यावर सरकार करत असलेले उपाय आणि त्यातून वाढतच जाणाऱ्या अडचणी ही सायकल न संपणारी आहे. त्याहून मोठी आहे ह्या प्रसंगातील असहायता आणि घबराट. आणि मग त्यातून होणारा दु:खाचा आणि चिडीचा उद्रेक. मोठ्या हॉस्पिटलमधे असणारे ऑक्सीजन व्हेंटीलेटर प्लँट, त्यांच्या किमती, मेंटेनन्स आणि ते सेंट्रलाईज असल्याने त्यामघे येणाऱ्या अडचणी (जसे आजची नाशीकमधील बातमी) किंवा शक्य असलेले कंटॅमिनेशन इ. पाहता आणि ऑक्सीजन सिलेंडरचे ट्रान्सपोर्टेशन, रिफीलींग इ. चे लिमीटेशन पाहता “ऑक्सीजन कॉन्संट्रेटर” मशीनचा पर्याय कालसुसंगत वाटतो.
हा वैय़क्तीक आजारपणाचा विषय नाही. कोरोना सामाजिक आजार आहे. त्यातून ऑक्सीजन ही खूप मोठी गरज आहे आरोग्य व्यवस्थेची. आपण पाहीले की माझा महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता बातमी नंतर ऑक्सीजन मशीन्स खूप मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या. नफेखोरी करत त्या कंपन्यांनी ३७००० च्या मशीन्स ६०००० ला देखील विकल्या.
पण लोकांनी घेतल्या. त्या व्यवसाईकाने ह्या संधीचा गैरफायदा घेत वारेमाप पैसे कमवले हा जरी हा एक भाग असला तरी ह्याची दुसरी बाजू आहे मशीन्स घेणारे लोक. सर्व मशीन्स घेणाऱ्या लोकांपैकी कुणीही मशीन्स लोकार्पण केल्या नाहीत. मशीन्स समाजासाठी उपलब्ध नसल्याने ऑक्सीजनचा तुटवडा आहे तसा आहे… खरे तर इच्छा होती की राजकारण्यांचे लक्ष वेधता येईल का, काही करता येईल का, पण झाले नाही.
आता असे वाटते की, हे अशा प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठीच आपण आषाढीची रचना केली आहे का? सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न हाताळता येऊ शकतात का? ही खरी परीक्षा असणार आहे आपण प्रत्येकाच्या स्कील, अनुभव आणि सामाजीक प्रतिमेची. विषय असा आहे की, “लोकसहभागातून पैसा उभा करून आपण आषाढीच्या माध्यमातून ह्या मशीन्स लोकांसाठी आणायच्या आणि सुरूवातीला महाराष्ट्राच्या आणि यथावकाश भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवायच्या. ज्या आहेत त्या किमतीत, नफेखोरी न करता. आणि ह्या ऑक्सीजन तुटवड्याच्या प्रश्नाला एक सामाजिक पर्याय द्यायचा”.