“आषाढी व्हेंचर्स” ही समविचारी मराठी लोकांनी एकत्र येऊन चालू केलेला भारतातील पहिला आणि एकमेव सामाजिक उद्योग (social startup) आहे ज्याची रचना ऑनलाईन झाली. भारत सरकारच्या कंपनी अधिनियमांनुसार २ मे २०२१ रोजी स्थापन झालेली ही कंपनी आता चांगला आकार घेत असून “मुक्त उद्यमशिलता” ह्या अत्यंत अभिनव संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत. आषाढी व्हेंचर्स ह्या “सोशल स्टार्टअप” मधे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो. समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला वेळ आणि रिसोर्सेस शेअर करून काही सकारात्मक आणि फायदेशीर प्रोजेक्ट करतानाच सामजिक भान देखील जपायचे असा हा फ्युजन कंसेप्ट आहे.

मुळात पूर्ण व्यावसाईक संकल्पना म्हटली की केवळ पैसे कमवणे हाच उद्देश राहतो. जे थोड्याफार प्रमाणात आपण सारे आपापल्या नोकरी धंद्यामधे करतच असतो. पण होते काय की, पैशाच्या मागे पळत असताना जगायचे राहूनच जाते. हा अनुभव थोड्याफार फरकाने सर्वांनाच आहे. उच्चपदस्थ अधिकारी असो की सामान्य गृहिणी, “जगायचे राहून जाते” हे कॉमन आहे… पण म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नाही… आपण सारे जगतोच आहोत की! आणि आनंदात जगतोय. आपापल्या पातळीवर काही ना काही करून आपापली स्वप्ने कमी-जास्त प्रमाणात साकारतोय आणि पुढची पिढी देखील घडवतोय.. पण तरी एक हुरहुर आहे पहा.. काहीतरी हरवत चाललेय… सुख? समाधान? धमाल? एंगेजमेंट? .. ह्या ओव्हररेटेड शब्दांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही..

एकच गोष्ट मिसींग आहे.. पॅशन! आपण नोकरी, धंदा व्यवसाय जे पण काही करतोय आणि पैशामागे धावतोय ह्यात पॅशन हरवून बसलोय…

हेच आणि इतकेच आम्हाला आषाढी व्हेंचर्स मधे करायचे आहे. मुळात निर्मिती सारखा आनंद नाही! काहीतरी बनवता यायला हवे आणि ते अनेक लोकांपर्यंत पोचवता यायला हवे. अहो साधे पापड करून विकायचे ह्यामधे लिज्जत पापड सारखी हजारो कोटी रूपयांची सोशल एंटरप्रेनरशीप आहेच की. तेव्हा तुम्ही नक्की काय करता ह्याला फार महत्व नाही. ते कसे करता ह्यातील पॅशन आणि मग तुम्हाला भेटत जाणारे तुमच्यासारखे वेडे लोक … हे खूप सजीव आहे.. आषाढीच्या वारीत सामील होणारे कित्येक वारकरी केवळ कळसाला नमस्कार करून परतात. विठ्ठलाच्या दर्शनात कृतार्थता असेलही, पण वारी हे जीवनाचे सार्थक आहे..

स्टार्टअप ही “केवळ” पैसे कमवायची संधी नाही. हा तुम्ही तुमचा घेतलेला शोध आहे. काय आहे तुमच्यात ते पडताळण्याची एक संधी. तुमची पॅशन फॉलो करायची एक संधी. अशा प्रकारची संधी आणि ते साकारायची यंत्रणा करायला खर्च येतोच. पण हा डोनेशन्स मधून येऊन उपयोगी नाही, कारण परत मग डोनेशन्सच्या अपेक्षादेखील येणार. हा आपणच उभा करायचा. म्हणून हे व्यावसाईक कंपनीचे स्वरूप आणि शेअरहोल्डींग. “आषाढी व्हेंचर्स” चे ३ वर्षात म्हणजे १००० दिवसात १००० सभासद आणि १ कोटी रुपयाचे कॅपिटल उभे करायचे टारगेट आहे. ह्यातून आम्हाला “गावरान” नावाच्या एका “रुरल ऍमेझॉन” ला जन्म द्यायचाय..

आषाढी व्हेंचर्स प्रायवेट लिमीटेड ही भारत सरकारच्या कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे. ही कुठल्याही प्रकारे मल्टीलेव्हल/नेटवर्क मार्केटींग सारख्या विषयांशी निगडीत नाही व समर्थन देखील करत नाही. ही “get rich quick” स्वरूपाची स्किम नाही की लॉटरी सारखी संधी नाही. सोशल स्टार्टअप हे सोशल वर्क किंवा सामाजिक संस्था देखील नाही.